मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ह्या विधानसभेची तयारी करीत आहेत. तसं त्यांनी जळगाव येथे पत्रकारांशी एकदा बोलूनही दाखवले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ते मुक्ताईनगर येथे एका कार्यक्रमात रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत दूजोरा दिला होता. वडील एकनाथ खडसे हे विधान परिषदेचे आमदार आहेत तर रोहिणी खडसे या स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.
एकनाथराव खडसे यांना शरद पवार साहेब यांनी आमदारकी देऊन त्यांचे राजकारण पुनर्जीवित केले आहे. तर रोहिणी खडसे यांना मोठी जबाबदारी दिली आहे. मोठी पदं खडसे कुटुंबियांजवळ असताना देखील रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी स्वघोषित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रोहिणी खडसे यांना जर उमेदवारी दिली तर मग भैय्या साहेबांचे काय होणार अशी चर्चा सध्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये रंगली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांचे पुनर्वसन होणार आहे की नाही असे देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
शरद पवार साहेबांची अत्यंत विश्वासू म्हणून भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांची ओळख आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये नेहमीच तळागाळात पोचवली आहे. एकदा लोकसभा आणि अनेक वेळा विधानसभेने हुलकावणी दिल्यानंतरही राजकीय दृष्टीने विचार केला तर भैयासाहेबांना अनेक संधी उपलब्ध झाल्यात परंतु स्वकीयानिच पाठीत खंजीर खुपसल्यामुळे त्या संधी हुकल्यात.भैय्यासाहेब शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. परंतु ज्या वेळेला देण्याची वेळ येते त्या वेळेला भैय्यासाहेबांचा विचार केला जात नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
भैय्यासाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी अनेक खस्ता खाल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मा. शरद पवार साहेबांचा शब्द हा शिरसावंद्य मानला आहे. पवार साहेबांसोबत भैय्या साहेबांची तिसरी पिढीही सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे व माननीय शरद पवार यांना भैय्यासाहेबांचा विचार करावाच लागणार आहे असे मत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. पवार कुटुंबाचा शब्द म्हणजे जणू काही भैय्यासाहेबांचा प्राणच. परंतु त्याच भैय्यासाहेबांना सत्तेची चावी कधी मिळणार असेही त्यांचे कार्यकर्ते विचारत आहेत.
जर रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरची उमेदवारी मिळणार असेल तर भैय्यासाहेबांचं काय? त्यांचं कुठे पुनर्वसन केलं जाणार? पवार साहेबांना जाणते म्हटलं जाते. त्याच पवार साहेबांनी आता आपल्या मानसपुत्राला आशीर्वाद देण्याची गरज आहे. असेही मत मुक्ताईनगर मतदार संघातील जनमानसात व्यक्त होत आहे. भैय्या साहेबांची बोदवड तालुक्यावर घट्ट पकड आहे. भैय्यासाहेब सांगतील तेच तोरण व तेच धोरण असे मुक्ताईनगर मतदार संघातील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आहे. रोहिणी खडसेंना मुक्ताईनगरची उमेदवारी मग भैय्या साहेबांचं काय असा यक्ष प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकला आहे.
राजकारणातील देव माणूस म्हणून भैय्या साहेबांची ओळख आहे. याच भैय्यासाहेबांनी नेहमी समर्पणाची भूमिका घेत पवार परिवाराच्या शब्दाला महत्त्व दिले आहे. भैय्यासाहेबांवर निष्ठा असणारे अनेक कार्यकर्ते आज मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये आहे. भैय्यासाहेबांवर अन्याय होत आहे असेही अनेक जण बोलून दाखवत आहेत. हा अन्याय रोहिणी नक्षत्रात बरसणाऱ्या पावसात वादळ होऊ नये. कारण राजकारणात काहीच अशक्य हे नसतं.
शेवटी डॉ.फणसेकर यांची ही कविता तंतोतंत भैय्यासाहेबांना लागू पडते
तुझं पाहिले मी मुक्ताई..
निशब्द मी झालो
विसरून मी दुःख
तुझ्या चरणावरचे फुल झालो….