सावदा/प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल, इंडो तिबेटियन दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या सह शहरातून जवानांनी सशस्त्रासह पथसंचलन केले.
पोलीस स्टेशनपासून गांधी चौक, गवत बाजार इंदिरा गांधी चौक, दुर्गा माता चौक रविवार पेठ चांदणी चौक पोलीस ठाण्यापर्यंत अशा मार्गावरून हे पथसंचालन करण्यात आले. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पथसंचालन करण्यात आले.
निवडणुकीमध्ये मतदानच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी सशस्त्र पथसंचलन करण्यात आले. इंडो-तिबेटियन (आयटीबीपी)दलाच्या जवानांनी सशस्त्रासह गावातून पथ संचालन केले. यावेळी सावदा पोलीस ठाण्यातील पोलीस दलाचाही यामध्ये समावेश होता.
या पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक अमोल गर्जे, बशीर तडवी, अन्वर तडवी आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पथसंचलनात इंडो तिबेटियन दलाचे चार अधिकारी ३० जवान, सावदा पोलीस ठाण्यातील 15 कर्मचारी जवान यांच्यासह पोलीसांचा समावेश होता. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळात कोणतेही गालबोट लागू नये, यासाठीची ही पथसंचलनाची तयारी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावदा शहरात पोलिसांकडून पथसंचलन
