अखेर रावेर तालुक्यातील पीकविम्याची मंडळनिहाय यादी जाहीर.

आठवडाभरात १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम, १३ हजार प्रकरणांचे क्षेत्र दुरुस्तीचे काम सुरू

सावदा, प्रतिनिधी : केळी पीकविम्याच्या महसूल मंडळांची यादी जाहीर करावी, मंजूर नुकसानभरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी तसेच विम्यातून वगळलेले क्षेत्र नियमित करावे, या मागण्यांसाठी रावेर तहसील कार्यालयासमोर महात्मा गांधी जयंतीनिमित्त केळी उत्पादक शेतकऱ्यांतर्फे ‘गांधीजी भजन आंदोलन’ करण्यात आले. तालुकाभरातून मोठ्या संख्येने शेतकरी व मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले.
आंदोलनाची दखल घेत तहसीलदार संजय तायडे, AIC पीकविमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अमित पवार, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांच्यासह संबंधित अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी रावेर तालुक्यातील पात्र महसूल मंडळांची यादी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
आठवडाभरात १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम
पीकविमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी अमित पवार यांनी आंदोलनस्थळी माहिती देताना आठवडाभरात सुमारे १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर पीकविमा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेक दिवसांपासून विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
१३ हजार शेतकऱ्यांच्या क्षेत्राची प्रक्रिया सुरू
दरम्यान, विमा प्रस्तावात क्षेत्र कमी दिसत असल्याच्या तक्रारी असलेल्या सुमारे १३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांची/प्रकरणांची प्रोसेसिंग सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे क्षेत्राच्या नोंदीतील त्रुटींमुळे रखडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणांना आता मार्ग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पैसे न मिळाल्यास रावेरमध्येच होणार त्रुटींचे निराकरण
ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होणार नाही, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी रावेर येथील पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारी व त्रुटी तपासून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
सावदा, खिरोदा मंडळाबाबत प्रश्न कायम
दरम्यान, जाहीर करण्यात आलेल्या मंडळनिहाय यादीत सावदा आणि खिरोदा प्र. यावल मंडळांना थंडीच्या ट्रिगरमधून वगळण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. या दोन्ही मंडळांतील शेतकऱ्यांना थंडीच्या प्रतिकूल हवामानाचा फटका बसला असताना त्यांना संबंधित ट्रिगरचा लाभ का देण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
मंडळनिहाय दावा परतावा दर
महसूल मंडळ
दावा परतावा दर प्रति हेक्टर
ऐनपूर
₹85,000
केऱ्हाळे बु.
₹85,000
खानापूर
₹85,000
खिर्डी बु.
₹85,000
खिरोदा प्र. यावल
₹52,821
निंभोरे बु.
₹85,000
पाल
₹74,679
रावेर
₹74,679
सावदा
₹52,821
‘आंदोलन थांबविण्याची विनंती’
अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत रक्कम जमा करणे, क्षेत्राच्या तक्रारींची प्रक्रिया सुरू करणे आणि विम्याशी संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी रावेरमध्ये कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थळी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अधिकाऱ्यांनी आंदोलन थांबविण्याची विनंती केल्यानंतर शेतकऱ्यांनी गांधीजी भजन आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
आता आश्वासनाची अंमलबजावणी कधी?
आंदोलनामुळे प्रशासन आणि पीकविमा कंपनीकडून ठोस आश्वासने मिळाली असली, तरी आठवडाभरात १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्ष रक्कम जमा होते का आणि १३ हजार शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील त्रुटी किती वेगाने दूर होतात, याकडे आता संपूर्ण रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांचे लक्ष लागले आहे.