सावदा पोलिसांची मोठी कारवाई; चोरीला गेलेल्या सहा बैलांचा शोध

सावदा : सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या गोठ्यातून चोरीस गेलेल्या तीन बेलजोड्यांचा पोलिसांनी छडा लावत तिघा संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी चोरीला गेलेल्या सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या सहा बैलांसह गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने, असा एकूण सुमारे ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सावखेडा बुद्रुक परिसरात ७ ऑगस्टच्या मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान अल्लाउद्दीन नवाब तडवी, गुलशेर बशीर तडवी आणि संजु नवाब तडवी यांच्या मालकीच्या तीन बेलजोड्या चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून संशयितांच्या हालचालींची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आवेश खान एजाज खान (२०), शेख हयात शेख मासूम (२५) आणि शेख नासीर शेख चांद कुरेशी (४२) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान चोरीच्या बेलजोड्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीनही बेलजोड्या जप्त करून त्या मूळ मालकांच्या स्वाधीन केल्या. तसेच चोरीसाठी वापरलेली महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप आणि हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या प्रकरणातील शेख राजीक, रा. रसुलपूर, ता. रावेर हा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलिसांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *