राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर डोक्यात गोळी झाडल्याचा प्रकार; गावठी कट्ट्यासह पाच खोके व दोन जिवंत काडतुसे जप्त
सावदा, प्रतिनिधी :
सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिनावल येथे मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरला. शेतीसोबत केळी व्यापार करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत स्वतःवर गोळी झाडून जीवन संपविल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. निर्मल युवराज महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे.
मंगळवारी (दि. ६) रात्री सुमारे १२.०५ वाजता निर्मल महाजन याने घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत स्वतःला बंद करून घेतले. त्यानंतर देशी बनावटीच्या पिस्तुलातून उजव्या कानशिलावर गोळी झाडल्याचे समोर आले. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळाच्या पंचनाम्यात पोलिसांना एक गावठी कट्टा, पाच रिकामे पुंगळे (खोके) आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.
मात्र, घटनास्थळी पाच रिकामे पुंगळे आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. गोळीबार नेमका किती वेळा झाला? ही काडतुसे यापूर्वी वापरण्यात आली होती का? तसेच गावठी कट्टा निर्मल महाजन याच्याकडे कसा आला, यासह विविध बाबींचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
निर्मल महाजन हा शेतीसोबत केळी व्यापार करत होता. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या तरुणाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक वाद, व्यावसायिक कारण अथवा अन्य कोणता ताण यामागे होता का, या सर्व शक्यता पोलिसांकडून तपासल्या जात आहेत.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास सावदा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे चिनावल परिसरात मध्यरात्रीपासूनच चर्चांना उधाण आले आहे.
