सावदा | प्रतिनिधी
सावदा शहरातील मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवर बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना अखेर सावदा पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. रस्त्यालगत मनमानी पद्धतीने वाहने उभी करणारे वाहनधारक तसेच दुकानांसमोर अतिक्रमणासारखी परिस्थिती निर्माण करणाऱ्या संबंधितांवर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला.
सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गामाता चौक ते शहरातील मुख्य बाजारपेठेत विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला, चौकांमध्ये आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी उभी केलेली वाहने हटविण्यात आली. अनेक वाहनधारकांना समज देण्यात आली, तर दुकानदारांनाही ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत याची जबाबदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
शहरातील मुख्य मार्ग अरुंद असताना त्यात भर म्हणून रस्त्यांवर तासन्तास उभी राहणारी दुचाकी व चारचाकी वाहने यामुळे नागरिकांना, रुग्णवाहिका, शालेय बस तसेच इतर आपत्कालीन वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पोलीस प्रशासनाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याने बेशिस्त वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील, मयूर पाटील, निलेश बाविस्कर व अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
“यापुढे विनाकारण रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू राहील,” असा स्पष्ट इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी दिला आहे.
दरम्यान, सावदा शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अपुरी पार्किंग व्यवस्था यामुळे वाहतूक नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आता गाडी रस्त्यावर लावली तर कारवाई अटळ!” सावदा पोलिसांचा बेशिस्त पार्किंगविरोधात दणका; दुकानदारांनाही दिला इशारा
