आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा
सावदा/प्रतिनिधी येथील अत्यंत प्राचीन असलेल्या सोमवारगिरी मढी येथे असलेल्या बखतगिरी समाधी देवस्थानाच्या सुशोभीकरणासाठी काल (दि. ५) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बखतगिरी देवस्थानाला तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत निधी मिळावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होती येथे हजरो भाविक दर्शनासाठी नित्य येत असतात. तथा मोठा वार्षिक समारोह शेकडो वर्षापासून होत असतो.ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. बखतगिरी समाधी स्थळाचे पावित्र्य पाहून तीर्थक्षेत्र विकास योजनेत तीन वर्षांपूर्वी या तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला होता.
या तीर्थक्षेत्राचे गांभीर्य व पावित्र्य लक्षात घेता काल संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीस लाख रुपयाचा निधी अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी मंजूर केला आहे.
या तीर्थक्षेत्राला निधी मिळावा म्हणून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व नियोजन समितीचे सदस्य राजेश वानखेडे यांनी मागणी लावून धरली होती. या कामाला काल अंतिम मान्यता प्राप्त होऊन 40 लाख रुपये मंजूर झाल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर केले. सदर निधी हा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश वानखेडे यांनी दिली आहे.
सदर कामाच्या संदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येऊन विविध लोकोपयोगी व धार्मिक स्वरूपाचे कार्य या ठिकाणी साकारणार आहे. यामुळे भाविकांचे व नगरवाशी यांची मागणी पूर्णत्वास येत असल्याने लोकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तर या संस्थानाच्या आचार्य महंत कृष्णगिरी बाबा यांनी लावून धरलेल्या मागणीला यश मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील ,राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री अनिल पाटील जिल्ह्यातील सर्व आमदार जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.