आमदार एकनाथ खडसे यांच्यावर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


सावदा (प्रतिनिधी):
सावदा पोलीस स्टेशनच्या आवारातच कायदा-सुव्यवस्थेला छेद देणारा गंभीर प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानपरिषदेचे सदस्य तथा माजी मंत्री एकनाथराव गणपतराव खडसे यांनी सावदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद भाषा वापरून दमदाटी केल्याची गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्यावरभारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत 296, 221,351/2,353, 112 117
अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तक्रारीत म्हटले आहे की,दि. २ जुलै २०२४ पासून सावदा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून नियमित कर्तव्य बजावत आहेत. दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता ड्युटीवर हजर झाल्यानंतर १२ वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आगम हायस्कूल येथील बंदोबस्त तपासून ते पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये कार्यालयीन काम करीत होते.
दरम्यान, दुपारी १२.३१ वाजता त्यांना फोन येऊन पोलीस स्टेशनच्या गेटवर बोलावण्यात आले. तेथे आ. एकनाथ खडसे हे त्यांच्या इनोव्हा (MH 19 CX 3303) गाडीत बसलेले होते. यावेळी त्यांनी तासखेडा (ता. रावेर) येथील गौणखनिज प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारत मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. तसेच “तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत”, “तुम्ही गु खाता का?” अशा शब्दांत अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षकांनी यावेळी दि. २९ जानेवारी २०२६ रोजी इरिगेशन विभागाचे अधिकारी भावेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. २३/२०२६, कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली. मात्र, तपास सुरू असल्याने कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने आ. खडसे अधिकच संतप्त झाले. त्यांनी आगामी अधिवेशनात “बघून घेतो”, “अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप लावतो” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे. संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनातील मंत्र्यांविरोधात अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
हा संपूर्ण प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडला असून त्या वेळी नागरिक, पोलीस अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष साक्षीदार होते. या घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, लोकप्रतिनिधीकडून पोलीस अधिकाऱ्याला धमकी व अपमान केल्याच्या आरोपांमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *