नोकरानेच रचला चोरीचा बनाव; दुकान मालकाचे १.९८ लाख रुपये लांबवले, सावदा पोलिसांनी ४ तासांत उघड केला गुन्हा

सावदा | प्रतिनिधी

रावेर येथील सरकारी मान्य देशी दारू दुकानातील कामगारानेच अज्ञात चोरट्यांनी पैसे लुटल्याचा बनाव रचून दुकान मालकाची तब्बल १ लाख ९८ हजार रुपयांची रक्कम अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक करून संपूर्ण रक्कम हस्तगत केली.

याबाबत सावदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथील हनुमान नगरातील रहिवासी राजेंद्र भगवान जयस्वाल (वय ६०) यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या सरकारी मान्य देशी दारू दुकानात शेख सुफियान शेख अतिक (वय २०, रा. नागझिरी रोड, ईमामवाडा, रावेर) हा कामगार म्हणून कार्यरत आहे. दुकानातील रोजची रोकड बँकेत जमा करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.

दि. १३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता दुकानातील १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड घेऊन तो रावेर येथील बँकेत जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रावेर-सावदा रस्त्यावरील राजदीप पेट्रोल पंपाजवळ दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर आले व त्यांनी पैशांची पिशवी हिसकावून नेल्याची माहिती सुफियानने दुकान मालकाला दिली.

घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप व पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून तसेच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. मात्र, कथित लुटीबाबत कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही.

दरम्यान, कामगार शेख सुफियान याच्याकडे संशयाची सुई वळाल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यानेच चोरीचा बनाव रचून पैसे स्वतःकडे ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९८ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम जप्त केली.

या प्रकरणी फिर्यादी राजेंद्र जयस्वाल यांच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीने खोटा बनाव रचल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३०६ नुसार कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप व सावदा पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *