रावेर/बऱ्हाणपूर प्रतिनिधी :
खानदेश आणि लगतच्या मध्य प्रदेशातील केळी पट्ट्यावर अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी घातलेल्या कहराचे परिणाम आता थेट बाजारपेठेत दिसू लागले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील केळीची आवक तब्बल निम्म्यावर आली आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने केळीच्या दरात अवघ्या चार दिवसांत सुमारे 900 रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून रावेर, यावल, मुक्ताईनगर तसेच बऱ्हाणपूर परिसरात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा सुरू आहे. अनेक ठिकाणी काढणीसाठी तयार असलेल्या केळी बागा अक्षरशः जमिनीवर आडव्या झाल्या आहेत. हजारो हेक्टरवरील बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातचे उत्पादन नष्ट झाले असून आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
या संकटाचा परिणाम थेट बाजारातील आवकेवर झाला आहे. काही दिवसांपूर्वी बऱ्हाणपूर बाजार समितीत दररोज सुमारे १५० ट्रक केळीची आवक होत होती. मात्र नैसर्गिक आपत्तीनंतर ही आवक शनिवारी घसरून केवळ ८० ट्रकांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास ५० टक्के घट झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उपलब्ध मालासाठी स्पर्धा निर्माण झाली असून दरात तेजी आली आहे.
गुरुवारी बाजार समितीत केळीला सरासरी २३७१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर सलग वाढ होत शनिवारी हा दर २८७१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला. तर रविवारी केळी खरेदीचा हा दर 3255 झाला आहे चार दिवसांत 900रुपयांची झालेली वाढ केळी बाजारातील सध्याच्या परिस्थितीचे चित्र स्पष्ट करणारी आहे.
मात्र, या दरवाढीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे वास्तव आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बागा सुरक्षित राहिल्या आहेत किंवा ज्यांचा माल बाजारात पोहोचला आहे, त्यांनाच या वाढीव दराचा फायदा होत आहे. दुसरीकडे, गारपीट आणि वादळामुळे ज्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्यांच्याकडे विक्रीसाठी मालच उपलब्ध नसल्याने वाढीव भावांचा कोणताही लाभ मिळत नाही.
यावर्षी आधीच वाढलेल्या खत, मजुरी आणि सिंचन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना नैसर्गिक आपत्तीने त्यांची कोंडी अधिकच वाढवली आहे. उत्पादन कमी आणि नुकसान जास्त अशा दुहेरी संकटाचा सामना केळी उत्पादकांना करावा लागत आहे.
बाजारातील जाणकारांच्या मते, नुकसानीचे प्रमाण मोठे असल्याने पुढील काही आठवडे केळीची आवक कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील तेजी कायम राहू शकते. मात्र, केवळ भाववाढीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नसून शासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
“केळी बाजारात तेजी, पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा; भाववाढीपेक्षा नुकसानभरपाईचीच अधिक गरज”
