केळीला आतापर्यंतचा उच्चांकी दर; मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती फायदा किती

सावदा, प्रतिनिधी :
केळी उत्पादकांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी म्हणजे बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी केळीला आतापर्यंतचा विक्रमी दर मिळाला. बाजार समितीत एकूण 85 गाड्यांची आवक झाली होती. त्यापैकी 82 गाड्यांची विक्री झाली असून प्रथम क्रमांकाच्या केळीला तब्बल 3,555 रुपये प्रति क्विंटल असा आतापर्यंतचा सर्वोच्च दर मिळाला आहे. त्यामुळे केळी बाजारात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथम दर्जाच्या उत्कृष्ट गुणवत्तेच्या केळीला 3,555 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला, तर द्वितीय क्रमांकाच्या केळीला 2,201 रुपये आणि तृतीय दर्जाच्या केळीला 1,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून कमी भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दरवाढ आशादायक मानली जात असली तरी प्रत्यक्षात या वाढीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वादळी वाऱ्याने केले मोठे नुकसान
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे सहा हजार हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उभ्या बागा आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यामुळे बाजारात केळीची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून उपलब्ध माल कमी झाल्याने भावात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, ज्यांच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना या वाढलेल्या दरांचा कोणताही लाभ मिळणार नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
दरवाढीमागे आवकेतील घट
व्यापारी आणि बाजार अभ्यासकांच्या मते, नैसर्गिक आपत्तीमुळे केळीची उपलब्धता कमी झाली आहे. बाजारात मागणी कायम असताना पुरवठा घटल्याने दरात तेजी आली आहे. आगामी काही दिवसांतही आवक मर्यादित राहिल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये संमिश्र भावना
एका बाजूला विक्रमी भावामुळे आनंदाचे वातावरण असले तरी दुसऱ्या बाजूला हजारो हेक्टरवरील नुकसानामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. “भाव वाढले, पण विकायला मालच शिल्लक नाही,” अशी भावना अनेक नुकसानग्रस्त शेतकरी व्यक्त करत आहेत.
“केळीला इतिहासातील सर्वोच्च भाव मिळाला, पण निसर्गाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या बागांमुळे हा सुवर्णक्षण अनेक शेतकऱ्यांसाठी केवळ आकड्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. भावाचा आनंद आणि नुकसानीचे दुःख अशा दोन टोकांच्या भावनांमध्ये खानदेशातील केळी उत्पादक आज सापडला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *