सावदा पोलीस ठाण्याला नवे प्रभारी; तक्रारी मात्र जुन्याच

बेशिस्त वाहतूक, अवैध धंदे, मोटारसायकल चोरी, मोटार पंप चोरीसह कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान

सावदा, प्रतिनिधी : सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची प्रशासकीय कारणास्तव पोलीस अधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी पदभार स्वीकारला आहे.
नव्या अधिकाऱ्यांच्या आगमनामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असल्या, तरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक जुन्या समस्या अद्याप कायम आहेत.
सपोनि विशाल पाटील यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामकाजात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ व सुटसुटीत करण्यासह नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पत्र्याचे शेड, दत्त मंदिराची उभारणी तसेच पोलीस अंमलदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था पोलीस दलाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत परिसरात चित्र अशा विविध उपक्रमांमुळे त्यांच्या कामाची छाप उमटली. गुन्हे उघडकीस आणण्यातही त्यांनी विशेष कामगिरी बजावत बऱ्हाणपूर येथील एका कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद केले होते.
दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांच्यावरील गुन्हा दाखल झाल्यानंतर सावदा पोलीस ठाण्याचे नाव राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर गेल्या चार-पाच महिन्यांत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे चित्र दिसून आले.
मात्र, सावदा शहरातील बेशिस्त वाहतूक, बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी पार्किंग, अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच तापी नदीकाठच्या गावांमध्ये वाढत असलेल्या मोटार पंप चोरीच्या घटना ही आव्हाने अद्याप कायम आहेत. याशिवाय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही संवेदनशील गावांमध्ये धार्मिक सलोखा कायम राखण्याचे आव्हानही नव्या अधिकाऱ्यांसमोर असेल.
आर्थिक गुन्हे शाखेतील अनुभव असलेल्या सपोनि गणेश फड यांच्या नेतृत्वाखाली या प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना होतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच वाहतूक, अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान आता नव्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *