सावदा | प्रतिनिधी
सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले आणि सावदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेले गारबर्डी धरण अखेर ओसंडून वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनी समाधानाचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातपुडा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गारबर्डी धरणाचा सर्वाधिक लाभ लोहारा, उटखेडा , चिनावल, वाघोदा, कोचूर, रोझोदा, खिरोदा, सावखेडा आदी गावांतील शेतकऱ्यांना होतो. धरणातून वाहणाऱ्या पाण्यामुळे सुकी नदीला प्रवाह मिळतो. या पाण्याचा थेट परिणाम परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि भूगर्भातील जलसाठ्यावर होत असून, पाण्याची पातळी स्थिर राहते किंवा वाढते, असा अनुभव स्थानिक शेतकरी दरवर्षी घेत आहेत.
यंदा एल-निनोच्या संभाव्य परिणामामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, गारबर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने खरीप हंगामासह आगामी रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धरण ओव्हरफ्लो झाल्याने केवळ सिंचनालाच नव्हे तर भूजल पुनर्भरणालाही मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच धरण परिसरात नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहनही करण्यात येत आहे.
गारबर्डी धरण ओसंडून वाहू लागल्याने सावदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ही केवळ आनंदाची बातमी नसून, आगामी शेती हंगामासाठी दिलासा देणारी आणि नव्या आशा निर्माण करणारी घटना ठरली आहे.
गारबर्डी धरण ओव्हरफ्लो; परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा, भूजलपातळी वाढण्याची आशा
