रावेर तालुक्यात बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू

सुतगाव येथे रानडुकरांच्या जाळ्यात अडकून प्राण गमावले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

सावदा प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील सुतगाव येथे रानडुकरांसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वन्यजीव संरक्षण आणि बेकायदेशीर जाळ्यांच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सुतगाव शिवारातील तापी नदी काठालगत असलेल्या पोटखराब भागात काही अज्ञात व्यक्तींनी रानडुकरांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. याच जाळ्यात अंदाजे अडीच ते तीन वर्षांचा नर जातीचा, सुमारे ३७ किलो वजनाचा बिबट्या अडकला. रात्रीपासून जाळ्यात अडकून राहिल्याने त्याच्या गळ्याला फास लागला होता. अन्न व पाण्याअभावी, तीव्र ताण, दमछाक आणि गंभीर जखमा यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे जाळे नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या लावण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित अज्ञात इसमांविरुद्ध वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांनी सांगितले की, “पोटखराब क्षेत्रात अज्ञानातून किंवा बेकायदेशीररित्या लावलेल्या जाळ्यांमुळे वन्यजीवांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.” तसेच अज्ञात इस्मविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान, मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढत असताना शेतकऱ्यांनी कायदेशीर व सुरक्षित उपाययोजनांचाच अवलंब करावा, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वन्यप्राण्यांचा वावर दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बिबट्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन्यजीव संरक्षणासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *