सावदा | प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील मध्य प्रदेश–महाराष्ट्र सीमेवर असलेल्या खानापूर नाका येथे आरटीओ कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांची उघडपणे अवैध वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार काल (दि. १ रविवार ) उघडकीस आला. आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट देत केलेल्या चौकशीत हा गंभीर गैरप्रकार समोर आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, खंडवा येथील खासदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाच्या लग्न समारंभातून परतत असताना आ. जावळे यांची गाडी खानापूर नाक्यावर थांबली. त्या वेळी कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली काही वाहनधारकांकडून थेट बेकायदेशीर रक्कम घेतली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
संशय बळावल्याने त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करत वाहनचालकांशी संवाद साधला. चौकशीत अनेक वाहनधारकांनी दंडाची भीती दाखवून आरटीओ कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळले जात असल्याची स्पष्ट तक्रार केली.
दरम्यान या अगोदरही या आरटीओ नाक्यांवर अवैधरक्कम वसुली होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी आमदार जावळे यांच्याकडे केली होती
या यावेळी पाहणीदरम्यान आरटीओ कार्यालयात मोठ्या प्रमाणात नगद रोकड आढळून आल्याची विश्वसनीय माहिती उपस्थित नागरिकांनी बनाना परिसराला दिली त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. ही रक्कम नेमकी कुणासाठी वसूल करण्यात आली? केवळ काही कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे की यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही आशीर्वाद आहेत? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “वसुलीखोर अधिकारी कोणाच्या आदेशावर काम करत होते?” हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
“सीमेवरून ये–जा करणाऱ्या सामान्य वाहनधारकांची अशा पद्धतीने अडवणूक करून पैसे उकळणे अत्यंत गंभीर आहे. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आणि या वसुलीच्या साखळीतील प्रत्येक घटक उघड झाला पाहिजे,” अशी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहे
या घटनेनंतर वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या प्रकरणात संबंधित वसुलीखोर अधिकाऱ्यांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे जिल्हाभरातून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
या दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांशी बनाना परिसर ने संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जळगाव जिल्हा परिवहन अधिकारी वर्मा यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणातील अहवाल मागविला आहे व केळीच्या गाड्यांना त्रास होऊ नये असे निर्देश आमदार जावळींनी दिले असल्याची माहिती आहे सविस्तर अहवाल आल्यानंतरच माहिती देऊ शकेल असे त्यांनी सांगितले
यावेळी घटनास्थळावर रावेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक जयस्वाल हेही काही वेळाने उपस्थित झाले होते असे समजते आहे
या प्रकरणात अद्यापही कुणावरही गुन्हा दाखल न झाल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खानापूर नाक्यावर आरटीओकडून अवैध वसुली;आ.अमोल जावळेंचे ‘स्टिंग ऑपरेशन
